दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख श्री. उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख श्री. शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान अनेक राजकीय मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेसंदर्भात अनेक अनुमान लावले जात आहेत त्यातील प्रमुख म्हणजे येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत क्षेत्रीय पक्षांना एकत्र करत भाजपला केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करणे आहे. यासाठी के. चंद्रशेखर राव प्रत्येक राज्यात जाऊन तेथील क्षेत्रीय पक्षांची भेट घेत आहेत. चंद्रशेखर राव यांच्या मते हे पाऊल भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणाला तडा देण्यासाठी उचलले जात आहे. (Political News India: Unity among state level parties in the country; Danger signs for BJP... )

के. चंद्रशेखर म्हणाले की, " देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. तरीही देशात असे खूप प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर अजून काही सत्ताधाऱ्यांना सापडले नाही. त्यासाठी आम्ही इतर क्षेत्रीय पक्षांशी भेटीगाठी करून या मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. खरंतर याच हेतूने मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत दाखल झालो आहे. या चर्चेत आम्ही देशाच्या विकासावर, विकासाची गती वाढवण्यावर आणि देशातील महत्त्वपूर्ण बदलावर चर्चा केली. मुख्यमंत्री साहेबांशी आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवारांशी बोलून मला खूप आनंद झाला. या देशाला एका महत्त्वपूर्ण परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही देशातील अनेक क्षेत्रीय पक्ष राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे विचार करत आहोत. अशा अनेक चर्चा होतच राहणार आहेत. मी उद्धव ठाकरे यांना तेलंगणामध्ये येण्याचेदेखील आमंत्रण केले आहे. पुढील बैठक हैदराबादमध्ये होण्याची शक्यता आहे." ते महाराष्ट्रबद्दल बोलताना म्हणाले की, " महाराष्ट्र राज्य हे छञपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राज्य आहे. देशातील अनेक परिवर्तनाची सुरुवात याच मातीतून झाली आहे. या दोघांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आम्ही या कामास सुरुवात करत आहोत."

शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, " शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी हि बैठक पार पडली. अनेक दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती, जी आज पूर्ण झाली. चंद्रशेखर रावांनी आणि राऊतांनी सांगितले ते अगदी खरे आहे. राज्यभरात आणि देशभरात जे राजकारणीय वातावरण निर्माण झाले आहे ते अतिशय निंदनीय आहे. "खालच्या पातळीचे राजकारण करणे, सदाकाळी सूडबुद्धी वापरणे," असे हिंदुत्व मुळातच नसते. अशा खालच्या पातळीच्या राजकर्त्यांना आळा घालण्यासाठी आमची हि चर्चा झाली. या चर्चेने दाखवलेली दिशा नक्कीच पुन्हा देशाची नवीन सुरुवात ठरेल."(Political News India: Unity among state level parties in the country; Danger signs for BJP... )

एनसीपी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज देशासमोरील समस्या, बेरोजगारी असो, शेतकरी आत्महत्या असो की अन्य समस्या, यावर काय करायला हवे, यावर आज चर्चा झाली.  तेलंगणाने शेतकऱ्यांसाठी उचललेल्या पावलांनी देशाला नवी दिशा दाखवली आहे.  बेरोजगारी आणि गरिबीपासून मुक्तता कशी मिळवता येईल आणि या मुद्द्यावरून देशात अनुकूल वातावरण कसे निर्माण करता येईल यावर आम्ही चर्चा केली.